Achievements

Unlock your true potential with us and embark on a remarkable educational journey.

'आयएएस' प्रथमेश राजेशिर्के यांचा 'कणाद क्लासेस' परिवाराकडून गौरव - रत्नागिरी

‘आयएएस’च व्हायचे अशी महत्त्वाकांक्षा बाळगून जिद्दीने उद्दिष्टपूर्ती करणारा मांडकी (चिपळूण) येथील युवक प्रथमेश अरविंद राजेशिर्के याचा रत्नागिरीतील ‘कणाद क्लासेस’ परिवारातर्फे नुकताच गौरव करण्यात आला. ‘कोविड’विषयक नियमांचे पालन करून आयोजित केलेल्या छोटेखानी घरगुती सोहळ्यात रत्नागिरीतील उद्योजक संतोष तावडे यांच्या हस्ते प्रथमेशला शाल आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
‘शिवसृष्टी’साठी प्रसिद्ध असलेल्या डेरवण येथील माध्यमिक शाळेतून प्रथमेश दहावी अर्थात एसएससी उत्तीर्ण झाला. त्यानंतर रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमधून (गव्हरमेन्ट पॉलिटेक्निक) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या परीक्षेत 99 टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. सांगलीच्या प्रख्यात वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मधून त्याने बी. टेक. (मेकॅनिकलइंजि) पदवी मिळविली.
कॉलेजमध्ये अभ्यासाला, प्रगतीला पोषक वातावरण असणाऱ्या या कॉलेजच्या माजी विदयार्थ्यांत बरेचजण आयएएस, आयपीएस झालेले होते. हे समजू लागल्यावर प्रथमेशला ‘दिशा’ मिळाली. पदवीच्या चौथ्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा अभ्यास सुरू केला. या परीक्षांमध्ये ‘आयएएस’ सर्वोच्च मानली जाते. प्रथमेशने त्याच परीक्षेचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले.
डिप्लोमाचे शिक्षण घेत असताना प्रथमेशने ‘कणाद क्लासेस’मधून मार्गदर्शन घेतले होते. या क्लासचे संचालक अरविंद बारसकर यांच्या प्रेरणेने नुकत्याच ‘आयएएस’ झालेल्या प्रथमेशच्या गौरवाचा घरगुती आणि छोटेखानी समारंभ नुकताच पार पडला.
‘कोविड’विषयक आरोग्य आणि अंतराचे नियम पाळून आयोजित केलेल्या या समारंभाचा प्रारंभ रुची दळी या निवेदिकेने सरस्वती स्तवनाच्या श्लोकाने केला. ‘कणाद’चे शिक्षक शिवराज बारसकर यांनी प्रथमेशचे वर्णन विनम्र स्वभाव, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचं उत्तम ज्ञान, मुंबईहून येणाऱ्या शिक्षकांच्या अनुपस्थितीत शिकविण्याची तयारी या शब्दांत केले. या गुणी तरुणाने उद्दिष्ट पूर्तीची अत्युच्च स्थिती गाठली आहे असं ते म्हणाले. अर्थ सल्लागार नचिकेत पटवर्धन म्हणाले की कोणत्या प्रकारचे शिक्षण झालेला मोठा असे म्हणण्यापेक्षा तळमळ असणारा मोठा, आणि प्रथमेश हे याचे उदाहरण आहे.रत्नागिरीतून एक विद्यार्थी यशस्वी झाला, आता कोंकणात ‘आयएएस’चे पीक येणार, असा आशावाद उद्योजक संतोष तावडे यांनी प्रकट केला.
ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी वीस वर्षांपूर्वी रत्नागिरीत आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर ‘आयएएस’ परीक्षा मार्गदर्शन शिबिर सर्वप्रथम आयोजित केल्याचे सांगून प्रथमेशच्या रूपाने या जिल्ह्यातील युवक यशस्वी झाल्याने आपले स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद प्रकट केला. इतर जिल्ह्यांप्रमाणे आपल्या जिल्ह्याला जिल्ह्यातीलच अधिकारी का येऊ शकत नाही, ही अस्वस्थता आज कमी झाली, असे ते म्हणाले. हॉटेल व्यावसायिक विवेक शानभाग यांनी प्रथमेशला शुभेच्छा देताना व्यावसायिकांना चांगले प्रशासक मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. शुभांगी बेडेकर यांनी रत्नागिरीतून डॉक्टर तयार होण्याचे प्रमाण कमी आहे, तेही बनले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
या सर्वांची छोटी छोटी समयोचित भाषणे झाल्यावर प्रथमेशने आपल्या यशस्वी प्रवासाचं वर्णन केले. देवावर अपार श्रद्धा, नियोजनबद्ध रीतीने, व्यवस्थित वेळापत्रक आखून केलेला अभ्यास आणि आपल्या उद्दिष्टाचा न पडलेला विसर हे आपल्या यशाचे गमक असल्याचे प्रथमेशने सांगितले. लष्करातून निवृत्त झालेल्या आपल्या वडिलांनी आपल्याला आपल्या उद्दिष्टापासून दूर जाऊ दिले नाही, ही बाब त्याने आवर्जून नमूद केली, मात्र तो आयएएस झालेला पाहण्यास वडील नाहीत, अंतिम टप्प्यातील मुलाखतीच्या काही दिवस आधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
परीक्षेची तयारी सुरू असताना राजेशिर्के कुटुंबियांना ‘कोविड’ने गाठले, स्वतः प्रथमेश आजारी पडला. रत्नागिरीत उपचार घेतले, पण कमालीचा अशक्तपणा आलेला, बोलण्याची शक्ती नव्हती, चालण्याची नव्हती. या काळात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धीर दिला…. “तू बरा व्हायला हवास, तुला आयएएस व्हायचंय,” या त्यांच्या शब्दांनी मन उमेदीने भरून जाई असे प्रथमेश म्हणाला.
“तरुणांत तीन ‘त’कार हवेत, तत्परता, तेजस्विता आणि तपस्विता. यशस्वी प्रथमेश हे तपस्वितेचे उदाहरण आहे,” असे समारोपाच्या भाषणात म्हणत ‘कणाद’चे प्रमुख अरविंद बारसकर यांनी या कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

स्वप्नपुर्तिचा प्रवास

प्रिय श्रीमत,
आज *तुझ्या मेहनतीन माझ्या स्वप्नांची* स्वप्नपुर्ती झाली. आज तु अमेरीके सारख्या ठिकाणी Automotive Engineering मध्ये MS केलस याचा *बाप म्हणून खुप अभिमान* वाटतो. विचार केला तर हे यश मिळवण तुझ्या सारख्याला काहीही अशक्य मुळातच नव्हत. हे यश तुझ्या मेहनतिने आणी *तुझ्यातल्या हुशारीने आपसुकच* तुझ्या पायाशी चालुन येणारच होत याची खात्री आम्ही आई वडिल म्हणुन तुझ्या जन्मापासुनच आम्हाला होती. परंतु या आजच्या यशापाठी तुझी गेली 20 वर्षाची मेहनत, तुझी तल्लख बुध्दी, तुझी अफाट असणारी स्मरणशक्ती इत्यादी गोष्टी कारणीभुत आहेत.
तुला इथपर्यंत पोहोचवायच हे माझ आणी तुझ्या आईच स्वप्न तुझ्या जन्माच्या आदीपासुनच होत. तुलाच काय तुम्हा दोघाही भावंडांना इथपर्यंत पोहोचवायच हे आमच स्वप्न. परंतु हे स्वप्न आकारात आणण आमच्या सारख्या मध्यमवर्गीय माणसाला तितकस सोप नव्हत हे देखील खर.
तु आणी सुमुख देखील तुम्ही आईच्या पोटात असताना पासुनच तुम्हाला कशा पध्दतीने घडवायच याची आमची चर्चा असायची. एक बाप म्हणून *मी स्वता कसा घडलो* किंवा *कस मला आणखीन चांगल घडता आल असत* याच शैल्य, दुख आजही माझ्या मनात आहे. प्रत्येक बापाला वाटत की माझ्या सारखी परिस्थिती मुलांवर येउ नये. याचाच विचार करून तुम्हा दोघांना आम्हाला जेवढ बेस्ट देता येईल ते देण्याच आम्ही ठरवल होत.
हे स्वप्न साकारताना जरा मागे वळुन पहावस वाटतय.
तुझा जन्म पालीत झाला आणी माझ पुर्ण आयुष्य पालीत गेल. त्यामुळे तुम्हा दोघांना रत्नागिरी सारख्या ठिकाणी शिकवायच मी ठरवल होत. तुझ्या जन्मानंतर पहिली 4 वर्ष तु पालीत आजी आजोबांच्या सानिध्यात वाढलास. त्यानंतर तुला बालवाडीत म्हणजे आत्ताच्या जमान्यात ज्याला केजी म्हणतात त्यात घालण्याची वेळ आली तेव्हा पाली सोडून रत्नागिरीत रहायला यायच ठरवल. घरात तुझ्या आजीचा विरोध होता. आणी मला सुध्दा कुटुंबापासुन लांब रहाण जड जाणार होत. घरात कमवता मी एकटा. काका रिक्षा चालवायचा. त्यातुन जेमतेम रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडले जायचे. ते साल होत 1998. मला पगार सुध्दा त्या काळी होता 1700/- रू.
आणी निर्णय झाला तुला रत्नागिरीत फाटक मध्ये घालण्याचा. परंतु रत्नागिरीत रहायच कुठे हा प्रश्न आवासुन समोर होता. ब्लॉकच भाड परवडणार नव्हत आणी चांगली खोली सुध्दा परवडणारी नव्हती. शेवटी रत्नागिरीत गाडीतळ जवळच्या भुवड आळी मध्ये एका कौलारू घराच्या एका बाजुला असलेल्या 6 फुट रूंद आणी 12 फुट लांबीच्या खोलीत आमचा संसार तुला घेऊन सुरू झाला. संसार कसला, झोपायला एक लोखंडी खॉट, एक लाकडी टेबल ज्यावर गॅस शेगडी, एक सिलेंडर, लग्नात मिळालेली 1 कळशी, 2 स्टीलचे हंडे (जे आजही आपल्याकडे आपण वापरतो), एक स्टीलची ताट लावायची मांडणी आणी अंगावरचे कपडे….. ती खोली कसली. तीच्या एका बाजुला उंची 10 फुट आणी दुस-या बाजूला ती लोखंडी खॉट ठेवल्यावर त्यावर मी बसलो की माझ डोक वर वाश्यांना लागायच. याच खोलीत जीला मराठी भाषेत मोरी म्हणतात ती. याच ठिकाणी आमची रोजची आंघोळ. ना टॉयलेटची सोय. टॉयलेट रत्नागिरी नगर परिषदेच सार्वजनिक की ज्यामध्ये जायच धाडसच व्हायच नाही. परंतु जगताना याचा विचार करून चालत नाही. आणी खोली भाड रू. 700/- . आमचा संसार तुला घेऊन सुरू झाला. मनोरंजनासाठी ब्लॅक अन्ड व्हाईट टिव्ही. केबल घ्यायची म्हटल तर त्याच त्याकाळी 200 ते 250 मासिक भाड परवडणार नव्हत. बर केबल घेतली तर चित्र तर पांढर काळ बघाव लागणार. आणी पगार पुरणारा नव्हता. म्हणुन ते देखील शक्य नव्हत.
तुला फाटक बालवाडीत प्रवेश मिळाला ( डोनेशन 5000/-) हे त्याकाळच डोनेशन माझ्या त्याकाळच्या पगाराचा विचार करता मला प्रचंड मोठ होत. तुझा प्रवेश झाला. मग काय खोली पासुन तुझी शाळा तशी जवळ. तुला आई नेहमी सोडायला आणी आणायला जायची. तु चालत अजिबात जायचास नाही. आई कायम तुला उचलुनच शाळेत पोहोचवायची. परंतु त्या *तुला उचलून घेऊन पोहोचवण्यात जो तिला आनंद मिळायचा त्याच वर्णन ति देखाल करूशकत नाही.* तु जेव्हा पहिलीत गेलास तेव्हा तुझी शाळा पुर्ण दिवस झाली. तु आणी सुमुखने देखील शाळेत जाण्याला कधीच नकार दिला नाही. तुम्हा दोघांना शाळा म्हणजे कायम प्रिय. कारण दंगा मस्ती तुम्ही शाळेतच जास्त केलीत. मला आठवतय तुला जेव्हा जेव्हा मी संध्याकाळी शाळेतुन घरी न्यायला यायचो तेव्हा तुझा अवतार बघण्यासारखा असायचा. शाळेचा संपुर्ण गणवेश मातीने पुर्ण लालेलाल झालेला. आम्ही गेटवर तुझी वाट पहात असायचो. तु शाळा सुटल्यावर हातातल दप्तर जणु दप्त नव्हे ते भिंगरी असल्यासारख गोल गरागर फिरवत एका पायावरच टणाटण उड्य़ा मारत यायचास. *असच बघायला मला आणी तुझ्या आईला कायम आनंद मिळायचा.* तुझ्या आईने तु मळवुन आणलेल्या कपड्यांबाबत कधीच तक्रार केली नाही. तुला शाळेचा ड्रेस कायम इस्त्री केलेला टकाटक लागायचा. *( फक्त निघताना🤣🤪 )*
तु पहिलीत असताना शाळेच्या शेजारीच श्री. बारस्कर सरांचे क्लासेस इयत्ता 4 थी ते 10 वी असे होते. त्या काळी 1ली ते 3 री क्लास ते घेत नव्हते. मला आठवतय की मी श्री. बारस्कर सर आणी मॅडमना भेटुन त्यांना विनंती केली की तुम्ही पहिलेचे क्लास घेणार का. त्यावेळी त्यांनी सांगितल की त्यासाठी मुल पण तेवढी हवीत. मी शाळेतील पालकांना भेटुन 1ली ला मुलांना क्लासला घालणार का अशी विचारणा सुरू केली असता अनेक काय सगळ्याच पालकांनी माझी जणु चेष्टाच केली. की, *पहिली हे काय मुलांच क्लासला जाण्याच वय आहे.* परंतु माझा माझ्या विचारांवर आणी 1लीच्या क्लास का या मागच्या संकल्पनेवर दृढ विश्वास असल्याने मी श्री. बारस्कर उभयतांना कळकळीची विनंती केली की तुम्ही श्रीमत ला एकट्याचा तरी क्लास घ्या. कुठे तरी सुरवात तरी करा मग मुल आपोआप येती आणी मी देखील प्रयत्न करेन. त्याकाळी या मागचा माझा उद्देश असा होता की, तुला शिकताना कमीत कमी शाळेत आणी क्लास मध्ये शिक्षणासाठी एवढा वेळ द्यावा लागतो, एवढा आभ्यास करावा लागतो याची सवय होईल. आणी तुला भविष्यात 10वी,12वी, आणी पुढे शिकताना जास्त वेळ आभ्यास करण्याचा कंटाळा येणार नाही. आणी मी माझ्या या प्रयोगात यशस्वि देखील झालो. श्री. बारस्कर सरांनी आणी मॅडमनी तुला एकट्याला घेऊन पहिलीचा क्लास सुरू केला. याचा परिणाम असा झाला की 1 ली मध्ये सहामाई मध्ये 1 लीच्या वर्गात पहिला नंबर काढलास. इथुनच तुझ्या प्रगतीचा अध्याय सुरू झाला. इतर पालकांना जेव्हा हि गोष्ट समजली तेव्हा सहामाई नंतर श्री. बारस्कर क्लासला आणखी 12 मुल जॉईन झाली. असे बारस्कर क्लासला 1ली मध्ये तुम्ही क्लास संस्कृती सुरू करणारे 13 जण आजही चांगले मित्र मैत्रिणी आहात हे त्या लहान वयात झालेल्या मैत्रिच देखील फलित आहे.
*आज तु जे काही यश मिळवल आहेस त्यामध्ये श्री. बारस्कर क्लासेसचा मोलाचा वाटा आहे.* श्री.बारस्करांकडे तु 1ली ते 9 वी पर्यंत कायम होतास. तुझ इंग्रजी, गणीत आणी सायन्स या तिन मुलभुत विषयांवरी असलेल प्रभुत्व हि *श्री. बारस्कर क्लासेसची त्या काळातली देणगी आहे.* या साठी आजच्या दिवशी त्यांचे रूण व्यक्त करण गरजेच वाटत. ज्याच सायन्स आणी गणित पक्क आहे तो कुठेही चमकणार हे मला देखील एक पालक म्हणुन पुरेपुर माहित होत. म्हणून मी देखील या दोन विषयांसाठी त्याकाळी तुझ्यावर आभ्यासासाठी भर देत असे. तुला आठवतय का माहित नाही. परंतु पहिली ते चौथी पर्यंत मी स्वता तुझ्या पुस्तकांचा आभ्यास करून मी स्वता पेपर काढून तुझ्याकडून सोडवुन घेत असे. ते सुध्दा घड्याळ लावुन… परंतु तुला आभ्यासाचा कधीच कंटाळा आलेला नाही. तसा तु एकपाटी. शाळेत, कॉलेज ते इंजिनिअरिंग मध्ये शिकताना तुझा एकच फंडा की, शिकवताना एकदाच ऐकुन मेंदूत पक्क साठवुन ठेवायच. 1 लीला असताना सकाळी 9 ला क्लास सुरू व्हायचा तो 10.30 पर्यंत आणी 10.30 ते 5 शाळा. याचा असा परिणाम झाला की तुला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 असा अभ्यास करायचा असतोच हि शिकवण मिळाली. त्यातुनच एका जागी तासनतास बसण्याची, कळ सोसण्याची तुझी मानसिक तयारी झाली आणी त्या तयारीचा फायदा तुला 10 वी ता आभ्यास करताना झाला. 10 वी मध्ये तु पहाटे 4 वाजेपर्यंत सुध्दा एकटाच आभ्यासाला बसलेला मी पाहिलेला आहे. किंवा सकाळी स्वताहून 4 वा. उठुन बसलेला पाहिलेला आहे.
तुझ्यातली हुशारीची चुणुक तु 2री मध्येच असताना दाखवली होतीस. 2री मध्ये महाराष्ट्र राज्यात घेतल्या गेलेल्या गणित प्राविण्या परिक्षेत तु राज्यात दुसरा आला होतास. हि यशाची चमक तु चौथीची स्कॉलरशिप, 7 वी मध्ये स्कॉलरशिप मध्ये येऊन तु काय ठेवलीस. 10 वी पर्यंत काही छोट्या मोठ्या शालेय, राज्यस्तरीय, स्पर्धापरिक्षा दिल्याने तुला CET,JEE सारख्या परिक्षांसाठी तुझा सराव आपोआप झाला.
10 वी मध्ये 98 टक्के मार्क्स मिळवुन तु यशाला गवसणी घातलीस. तुझ्या वैचारिक मनावर, शिक्षणावर किंवा संस्कारावर तुझ्या मैत्रिचा, मित्रांच्या संगत म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होऊ दिला नाहीस. यासाठी एक वडिल आणी आई म्हणून आम्ही दोघ देखील कायम सतर्क होतो म्हणा.
11 वी 12 वीत *तु उनाडक्या करून* 🤪🤣🤣😂, आभ्यास न करता सहज लिलया पास झालास. तेच इंजिनिअरिंग करताना केलस. इंजिनिअरिंग करताना तु पुस्तक परिक्षेच्या आदल्या दिवशीच उघडायचास. मग मात्र पहाटे 5 वाजेपर्यंत आभ्यास आणी परिक्षा हे गणीत काही बदलल नाही.
तु 10वीत असतानाच तुझ्या इंजिनिअरिंगचा प्रवेश व पुढे 4 वर्ष भरावी लागणारी फि याचा खुप ताण येणार होता हे लक्षात आल होत. मग काय खर्च कमी करून तुझ्या फिच नियोजन योग्य पध्दतीन केल. आजही मी अनेकांना हे सांगतो नियोजन योग्य केल तर अशक्य काही नाही. 10 वी पासुन दरमहा 5 हजारची आर डी बचत सुरू केली. वर्षाला व्याजासह 62000/- जमा व्हायचे. ते 5 हजार देखील तेव्हा साठवताना नाके नऊ यायचे. परंतु या बचतीच्या योग्य नियोजनातुन तुझ इंजिनिअरिंगच शिक्षण पुर्ण झाल.
फिनोलेक्सला इंजिनिअरिंग करतानाच तुला मी GRE exam दे आणी TOEF exam देऊन ठेव. आणी इंजिनिअरिंग करून बाहेर पडल्या पडल्या तु MS करायला बाहेर जा अस सांगितल होत. परंतु तुझ्या डोक्यात GATE Exam देऊन भारतातच mtech करायच खुळ घुसल. त्यासाठी तु इंजिनिअरिंग पुर्ण झाल्यावर पुण्यात क्लासेस जॉइन केलेस. तिथे 6 महिन्यांनी इतर मुलांच्या सानिध्यात आल्यावर तुझ्या लक्षात आल की तु MS करण्यासाठी बाहेर जाव. आणी तु पुन्हा जिद्दीने GRE exam चे क्लासेस जॉइन केलेस. या सगळ्या प्रोसेस मध्ये तुझ दिड वर्ष फुकट गेल होत.
GRE exam दिलीस आणी तुला पहिल्या अटेंड मध्ये 304 की 305 मार्क्स मिळाले. या मार्कांवर तुला कुठेही प्रवेश सहज मिळणार होता परंतु तुला टॉप university मध्ये प्रवेश घ्यायचा असल्याने आणी त्यासाठी 310 च्या पुढे मार्कांची आवश्यकता असल्याने तु पुन्हा त्याच जिद्दीने GRE exam दिलीस आणी तुला दुस-यावेळी 312 मार्क्स मिळाले. यामुळे तुला टॉप 20 मधल्या अश्या नामंकीत clemson university मध्ये प्रवेळ मिळाला.
माझ देखील स्वप्न होत की तु MS परदेशात जाऊन कराव. कारण तेवढी बुद्धिमत्ता तुझ्यात होती. परंतु हे सांगताना माझ्या जवळ साधे लाख रूपये देखील नव्हते. पैशाचा पत्ता नाही आणी आपण मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवायची स्वप्न बघतोय याची सारखी जाणीव होती. परंतु माझी आणी तुझ्या आईची, आजी ची श्री. गजानन महाराज्यांवर असलेली अपार श्रध्दा सांगत होती की महाराज्यांच्या कृपेने यातुनही मार्ग निघतील.
जेव्हा तु GRE exam पास झालास तेव्हा नंतर आपण पैसे जमवण्याचा, मिळवण्याचा मार्ग शोधायला लागलो. रत्नागिरीतल्या अनेक बॅंकांच्या पाय-या तु आणी मी झिजवल्या. त्यांच्या अटी आणी त्या अटींच्या माध्यमातुन मिळणारे फंड्स तुझ्या शिक्षणासाठी पुरेसे नव्हते. त्यांच्या साध्या व्याजाची सुध्दा मि परतफेड करू शकत नव्हतो. मला आणी तुझ्या आईला रात्रंदिवस सतावत होत की मुलाला MS च स्वप्न दाखवुन आपण चुक तर नाही ना केली. तुला जाता नाही आल तर त्याचा तुझ्या मनावर होणारा परिणाम इत्यादी गोष्टी सतत मनात येत होत्या. परंतु महाराज्यांवर असलेली श्रध्दा, यातुनही काहीतरी मार्ग निघेल. वेळ पडल्यास रहाता ब्लॉक विकुन आपण पालिला जाऊन राहू परंतु तुला शिक्षणासाठी बाहेर पाठवुच हे पक्क ठरवल होत.
जॅवेळी MS साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तेव्हा. शैक्षणिक कर्ज एचडीएफ सि बॅंकेतुन घ्याच ठरल. त्यांनी 40 लाख कर्ज मंजूर देखील केल. भारतातील कोणत्याही बॅंकेची जास्तीत जास्त शैक्षणीक कर्ज देण्याची लिमिट 40 लाखच असल्याने नाईलाज होता. खर्च बजेट होत 65 लाख. वरचे पैसे आणायचे कुठुन. मग पालीतली जमिन विकण्याचा निर्णय.
यातच भर म्हणून university प्रवेश आणी व्हिसा मिळवताना कर्जासह कमीत कमी 1 कोटी फंड असण्याचे दाखवायला लागणार असल्याने आलेल टेन्शन. पासबुकात कमीत कमी 3 महिने 6 लाख कंट्युनि बॅलन्स दाखवायला लागणार होता. त्यासाठी कसेबसे 3 लाख जमवले परंतु उर्वरित 3 लाख एवढी मोठी रक्कम कुठुन आणायची आणी एवढ्या विश्वासान कोण ती देणार. अशा वेळी मैत्रीच नात कामी आल. ऑफिस मधुन 1 लाख आणी एका मित्राने 2 लाख दिले. नंतर सर्व दागिन्यांचे व्हॅल्युएशन पहाता ते शक्य नसल्याने नाईलाजाने फक्त कागदोपत्री रक्कमा दाखवण्यासाठी केलेल्या अनंत खटपटी.
परंतु तरीही काही तिथला खर्च,फि…इत्यादी अशक्यच होत होत…. अशातच अचानक तुला clemson university मध्ये प्रवेश देत आहोत याचा फोन आला. तु आनंदाने नाचलासच …. तेव्हा मला माहित नव्हत की तु एवढा का आनंदी झाला आहेस. सर्वांनी तुझ अभिनंदन केल. कारण जगातल्या टॉप 20 मधल्या university मध्ये तुला प्रवेश तो तुध्दा तुला पाहिजे त्या ट्रेड साठी मिळाला होता. माझी छाती देखिल अभिमानाने फुगुन गेली होती. मी हि तुझ्या अभिमानाची गोष्ट माझ्या मित्र मंडळींना सांगत सुटलो. त्यावेळी तु प्राप्त केलल यश मी माझ्या मित्रांमध्ये सांगत होतो. ते तुझ अभिनंदन करत होते.
clemson university मध्ये तुला तुझ्या अथक परिश्रम आणी कष्ट, हुशारी आणी महाराज्यांची कृपा यामुळे प्रवेश मिळाला आणी त्यामुळे आर्थिक मार्ग सुखकर झाला. परंतु त्याच वेळी university मधली फि देखील जास्त असल्याने 65 लाख पुरणारे नव्हते. अशा वेळी तुला अमेरीकेतल्याच बॅंकेने डॉलरमध्ये सर्व कर्ज कमी व्याजदरात देत असल्याच सांगितल. कोणताही जामीन नाही. बोजा नाही. फक्त आणी फक्त निव्वळ तुझ्या एका सहिने तुला तिथे गेल्यावर निव्वळ तुझ्या टॉप 20 मधिल प्रवेशाच्या जोरावर कर्ज मिळाल. त्यामुळे आमच्या मनावरच एक मोठ ओझ कमी झाल होत.
राहिला प्रश्न तुझा जाण्याचा खर्च, कपडे खरेदी, तिकीट, तिकडचे रूम डिपॉझीट… इत्यादीला सुध्दा माझ्या मित्राने हातभार लावल्याने महाराज्यांच्या कृपेने सर्व सुखरूप पार पडल.
आज तु चांगल्या मार्का ने पास झालास….
हे सर्व होताना मी आणी आई निमित्तमात्र होतो. तु तुझ्या हुशारीने, चांगल्या संस्काराने, आणी कष्टाने इथपर्यंत पोहोचला आहेस. *याच सर्व 100 टक्के श्रेय्य तुला जात.* 🥰😍
तु अमेरीकेत नोकरी कर, पुढे शक्य झाल्यास डॉक्टरेट हो. खुप मोठा हो नाव, पद प्रतिष्ठा आणी पैसा नक्की मिळव. पैसा हे जगण्याची गरज आहे. परंतु त्यामुळे त्याच्या पाठी लागुन आयुष्य उपभोगायच राहू नको.
जगताना नेहमी तुझे डोळे मातृभुमिकडे असुंदेत. मातृभुमीच आणी समाजाच्या उपकाराच आपण काही ना काही देण लागतो ते परत द्यायच असत हे संस्कार तुझ्यावर आम्ही केलेले आहेत हे कधिच विसरू नकोस. कितीही मोठा झालास तरी गरजवंताना मदत करण हे आपल कर्तव्य आहे. आपल्याला समाजाने इथपर्यंत पोहोचण्यासाठी जशी मदत केली तशी इतरांसाठी देखील आपण करायची असते हे ( माणस ओळखुन, पारखुन) मी आवर्जुन सांगेन.
आणी दैवी शक्तीला कधिच विसरू नको. जस शक्य होईल तस आध्यात्म अंगिकार.
गजानन महाराज सदैव तुझ्या पाठिशी आहेत. तुझ्यावर येणारी सर्व संकट आणी तुझ्या वाट्याला येणारी सर्व दुख: परमेश्वर मला देवो…. आणी तुला आणी सुमुखला फक्त आणी फक्त आनंदच वाट्याला येवो हिच त्या परमेश्वर चरणी प्रार्थना.
तुझ्या या यशाबद्दल पुनश्च तुझ मनापासुन अभिनंदन.! 💐🌺🌹
लवकर भेटायला ये. तुझ्या भेटीची ओढ लागुन राहीली आहे आम्हा सर्वांना.
तुझा
बाबा…